
सोलापूर, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आज इंद्र भवन येथे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळच्या सुमारास पार पडलेल्या या कार्यक्रमाला मान्यवर, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले आणि संपूर्ण परिसर देशभक्तीपर वातावरणाने भारून गेला.या कार्यक्रमास उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते श्री. नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती सौ. रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, नगरसेवक श्री. विनोद भोसले, नगरसेविका सौ. कल्पना कदम, सौ. संगीता जाधव, तसेच नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर माकल, श्री. महेश देवकर, श्री. नागेश खरात, श्री. पृथ्वीराज कोंड्याल उपस्थित होते.तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे, सौ. वीणा पवार, उपायुक्त सौ. अश्विनी लोकरे, उपायुक्त सौ. सोनाली यादव यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.यावेळी महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी उपस्थितांना संबोधित करत महाराष्ट्र दिन आणि महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. सोलापूर शहराच्या विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून, नागरिकांना दर्जेदार व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते विकास, आरोग्य सुविधा आणि इतर नागरी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आगामी काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने व प्रभावीपणे काम करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.एकूणच, महाराष्ट्र दिन आणि सोलापूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड