
पुणे, 01 मे (हिं.स.)।
मुंबई-पुणे आणि साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सलग सुट्ट्यांमुळे हजारो नागरिक गावाकडे निघाल्याने पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. विशेषतः खेड शिवापूर टोलनाक्यापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक वाहनचालक तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडले आहेत.
मुंबई आणि पुण्यातून मोठ्या संख्येने नागरिक सातारा, कराड, सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना होत आहेत. सलग सुट्ट्यांचा फायदा घेत अनेक कुटुंबांनी गावाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याने सकाळपासूनच महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढू लागला. परिणामी परिस्थिती अधिक गंभीर झाली आणि अनेक ठिकाणी वाहनांची गती पूर्णपणे मंदावली.
खेड शिवापूर टोलनाक्यावर सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. टोल भरण्यासाठी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. टोलनाक्यावरून वाहने पुढे जाण्यास उशीर होत असल्याने त्याचा परिणाम मागील वाहतुकीवर झाला. त्यामुळे काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा वाढल्या. नवीन कात्रज बोगद्याजवळही वाहनांची संथ गती दिसून आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु