
बीड, 01 मे (हिं.स.)। पाटोदा नगरीत महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पावन वास्तव्याने धन्य झालेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवास वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास आमदार सुरेश धस उपस्थित राहिले.
यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, सन २०१९-२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री जयकुमारजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाच्या विशेष योजनेतून मंजूर ₹२.५१ कोटी निधीतून सुसज्ज हॉल, निवासी खोल्या, टॉयलेट-बाथरूम सुविधा, संरक्षण भिंत, पाणी फिल्टर आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नानासाहेब डीडुळ, सतीश बप्पा जाधव व सहकाऱ्यांनी अत्यंत गुणवत्तापूर्ण काम करून पाटोद्यात एक सुंदर वास्तू साकारली आहे.
या प्रसंगी महानुभाव पंथाची समता, साधेपणा व सर्वसमावेशकता अधोरेखित करत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी मराठीतील ‘लीळाचरित्र’च्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. पाटोदा हे त्यांच्या वास्तव्याने पवित्र स्थळ असून, या ठिकाणाचा विकास आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य शासनाकडून महानुभव पंथ व श्री चक्रधर स्वामी मंदिर विकासासाठी मोठा निधी मंजूर झाल्याने भविष्यात पाटोदा शहराला धार्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त होईल, असा विश्वास आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis