अमरावतीच्या ‘लाईफलाईन’ उड्डाणपुलाचे काम अर्धवट; नव्या पुलासाठी नागरिकांची प्रतीक्षा वाढली
अमरावती, 01 मे (हिं.स.)। शहराची ‘लाईफलाईन’ समजला जाणारा राजकमल चौक ते रेल्वे स्थानकदरम्यानचा रेल्वे उड्डाणपूल पाडण्याचे काम अजूनही अर्धवटच असून नागरिकांच्या प्रतीक्षेला अधिक काळ लागणार आहे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होत
अमरावतीच्या ‘लाईफलाईन’ उड्डाणपुलाचे काम अर्धवट; नव्या पुलासाठी नागरिकांची प्रतीक्षा वाढली


अमरावती, 01 मे (हिं.स.)।

शहराची ‘लाईफलाईन’ समजला जाणारा राजकमल चौक ते रेल्वे स्थानकदरम्यानचा रेल्वे उड्डाणपूल पाडण्याचे काम अजूनही अर्धवटच असून नागरिकांच्या प्रतीक्षेला अधिक काळ लागणार आहे. २४ ऑगस्ट २०२५ रोजी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आठ महिने उलटूनही काम केवळ सुमारे ५० टक्केच पूर्ण झाले आहे.

उड्डाणपुल तोडण्याच्या प्रत्यक्ष कामाला मार्च २०२६ मध्ये सुरुवात झाली. सुरुवातीला आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात वेळ गेला. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून दोन महिन्यांची डेडलाईन देण्यात आली होती. मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे संकेत देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अजूनही मोठा भाग बाकी आहे.

सध्या पुलावरील बहुतांश सिमेंटचा डेक स्लॅब कापून हटविण्यात आला आहे. क्रेनच्या सहाय्याने टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात आले. आता केवळ लोखंडी ढाचा शिल्लक असून तो खाली उतरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम मुंबईस्थित ‘मते अँड असोसिएट्स’ या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण पाडकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, उड्डाणपुल पाडण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने नवीन पुलाच्या बांधकामाबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. वाहतुकीची मोठी कोंडी होत असून पर्यायी मार्गांवर ताण वाढला आहे. नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर नवीन पुलाच्या बांधकामासाठी आमदार सुलभा संजय खोडके यांनी सुमारे १२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. नवीन पूल उभारणीसाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एकूणच, शहराच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा अमरावतीकर व्यक्त करीत आहेत. नवीन पूल उभारल्यानंतरच वाहतुकीत खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande