
ठाणे, 01 मे (हिं.स.)। मुंबई–पुणे मिसिंग लिंक रोडच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या मार्गाला “वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर” यांचे नाव देण्याची मागणी धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे.
मुंबई–पुणे मार्गाच्या उभारणीत शिंग्रोबा धनगर यांचे योगदान ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सुमारे १८५० च्या काळात इंग्रजांना बोरघाट (मुंबई–पुणे) परिसरातून मार्ग काढताना अडचणी येत होत्या. त्यावेळी खोपोली परिसरातील शिंग्रोबा धनगर यांनी त्यांना हा दुर्गम मार्ग दाखवला. विशेष म्हणजे, कोणतेही इनाम नाकारत त्यांनी “देशाला स्वातंत्र्य द्या” अशी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या धाडसी भूमिकेमुळे संतप्त इंग्रजांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे सांगितले जाते.
ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या बोरघाट परिसरात आज शिंग्रोबा धनगर यांचे मंदिर असून ते भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
यापूर्वी मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्या वेळी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंक रोडला तरी शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
खंडाळा घाट परिसरातील शिंग्रोबा धनगर मंदिर आजही हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्या बलिदानाची दखल घेत शासनाने या नव्या मार्गाला त्यांचे नाव द्यावे, अशी अपेक्षा धनगर समाजाकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर