गडचिरोलीत ५ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण
गडचिरोली, 16 मे (हिं.स.) : गडचिरोली जिल्हा पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त कारवाईला मोठे यश मिळाले असून, आज ५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये १ डीव्हीसीएम, १ पीपीसीएम आणि १ एसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्या
आत्मसमर्पण केलेले नक्सल


गडचिरोली, 16 मे (हिं.स.) : गडचिरोली जिल्हा पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) यांच्या संयुक्त कारवाईला मोठे यश मिळाले असून, आज ५ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये १ डीव्हीसीएम, १ पीपीसीएम आणि १ एसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह 2 सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर मिळून महाराष्ट्र शासनाने ३८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. या आत्मसमर्पण कार्यक्रमाला CRPFचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष अभियान पथक (C-60) आणि पोलिस दलाच्या विविध शाखांनी या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

राज्य शासनाच्या पुनर्वसन धोरणामुळे आणि हिंसक जीवनाला कंटाळून या माओवाद्यांनी मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्मसमर्पणानंतर गडचिरोलीतील माओवादी चळवळ आता केवळ भामरागड उपविभागाच्या सीमावर्ती भागात मर्यादित राहिल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. आत्मसमर्पण केलेल्या पाच जणांमध्ये छत्तीसगडमधील ४ आणि गडचिरोलीतील १ सदस्य आहे. सर्वांवर पूर्वी मोठे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पुनर्वसन धोरणांतर्गत त्यांना शासनाकडून आर्थिक मदतही मिळणार आहे. या गटात मधु ऊर्फ राकेश आणि रजनी ऊर्फ दुर्गा हे पती-पत्नी असून, शासनाच्या धोरणानुसार त्यांना अतिरिक्त मदत मिळणार आहे. तसेच, गटाने एकत्र आत्मसमर्पण केल्यामुळे अतिरिक्त प्रोत्साहन रक्कमही मंजूर करण्यात आली आहे.

माओवादी चळवळीला मोठा धक्का

गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या आत्मसमर्पणांमुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. १५ ऑक्टोबर २०२५ रोजीही ६१ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून देशभरात १,०६३ माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या माओवादविरोधी अभियानामुळे २००५ पासून आतापर्यंत ८१९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. केवळ २०२५ पासून आतापर्यंत १३७ माओवाद्यांनी शस्त्र खाली ठेवले आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande