
मुंबई, 20 मे (हिं.स.) - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, या चर्चेला जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती अशी की, सदर बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाली. पक्षाने विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या बैठकीला उपस्थित असलेले नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. यावर बोलताना अखेर पक्षातील वरिष्ठांनी विलिनीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही, असे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडून या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा पडला आहे.
दरम्यान या बैठकीत शरद पवार हे देखील उपस्थित होते. मात्र त्यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या भूमिकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु शरद पवार यांच्या समक्षच विलिनीकरणावर भूमिका मांडण्यात आल्यानं ते देखील या भूमिकेशी सहमत आहेत, अशी आता चर्चा सुरू झाली आहे. परंतु पवार यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी होती, अशी अपेक्षा या बैठकीला उपस्थित नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान या बैठकीवर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. पक्ष संघटना मजबूत करून मोठ्या उमेदीने काम करायचं आहे, असा निर्णय या बैठकीत झाला आहे. सक्षम विरोधी पक्ष आम्ही उभा करणार आहोत. विलीनीकरण विषय संपला आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी