
नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.) : उत्तरप्रदेशातील रायबरेली येथे आयोजित जनसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कठोर शब्दांत टीका करत त्यांना “गद्दार” असे संबोधले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
राहुल गांधी यांनी सभेला संबोधित करताना “तुमचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत” असे म्हटले. तसेच त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देश विकण्याचा आरोप करत संविधान तसेच महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वीर पासी यांच्या विचारांवर हल्ला केल्याचा दावा केला.त्यांनी पुढे सांगितले की, देशातील आर्थिक परिस्थिती कमजोर होत असून सरकार नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. पेट्रोल दरवाढ आणि आर्थिक धोरणांवर टीका करत त्यांनी काही उद्योगपतींच्या नावांचा उल्लेख करत परकीय तेल व्यापार आणि राजकीय निधी यांच्यात संबंध असल्याचा आरोपही केला.
राहुल गांधी यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली. भाजपने राहुल गांधींवर देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधींची भाषा “शत्रूराष्ट्रासारखी” असल्याचे म्हटले. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींचे वक्तव्य लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोप करत, त्यांच्या भाषेला पाकिस्तान समर्थक विचारसरणीची छटा असल्याचे म्हटले.भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी, देशात दहशतवाद आणि नक्षलवादाविरुद्ध लढणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे सांगत जनतेलाच योग्य उत्तर देईल, असे नमूद केले.
माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही राहुल गांधींच्या विधानावर टीका करत, काँग्रेसकडून वारंवार अपमानास्पद भाषा वापरण्याची परंपरा असल्याचा आरोप केला.या घडामोडीमुळे राष्ट्रीय राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी