अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू-मुंबई एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.)। केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बेंगळुरू-मुंबई एक्सप्रेस रेल्वे सेवेचे आभासी माध्यमातून उद्घाटन करत हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल, असे त्यां
ASHWINI VAISHNAW BENGALURU MUMBAI TRAIN FLAGOFF


नवी दिल्ली, 17 मे (हिं.स.)। केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बेंगळुरू-मुंबई एक्सप्रेस रेल्वे सेवेचे आभासी माध्यमातून उद्घाटन करत हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बेंगळुरू आणि मुंबईदरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण केल्या जात आहेत. त्यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत लक्षणीय वाढ करण्यात आली असून त्यामुळे कर्नाटकातील रेल्वे प्रकल्पांची कामे वेगाने पुढे जात आहेत.

ते म्हणाले की, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कर्नाटकातील 61 रेल्वे स्थानकांचा 2,160 कोटी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास केला जात आहे. यापैकी 9 स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. बेंगळुरू कॅन्टोनमेंट स्थानकाचा 485 कोटी रुपये आणि यशवंतपूर स्थानकाचा 367 कोटी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास करण्यात येत आहे.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 2014 नंतर कर्नाटकमध्ये सुमारे 1,750 किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग टाकण्यात आले आहेत. हासन-मंगळुरू विभागातील जटिल विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले असून सध्या चाचण्या सुरू आहेत.

ते म्हणाले की, बेंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्पाच्या चारही कॉरिडॉरवर काम सुरू आहे. बैयप्पनहल्ली-चिक्कबनावरा आणि हीलालिगे-राजनुकुंटे कॉरिडॉरमध्ये जमीन अधिग्रहण पूर्ण झाले असून स्थानकांच्या बांधकामाचे काम सुरू आहे. केएसआर बेंगळुरू-देवनहल्ली मार्गाला राज्य सरकार आणि रेल्वेची संयुक्त मंजुरी मिळाली असून भू-तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. केंगेरी-व्हाइटफिल्ड मार्गालाही नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले की, सध्या कर्नाटकमध्ये 12 जोड्या वंदे भारत गाड्या धावत आहेत. बेंगळुरू-मंगळुरू मार्गावर चाचण्या सुरू असून त्यामुळे किनारी भागांशी संपर्क अधिक सुधारेल. बेंगळुरूला हैदराबाद आणि चेन्नईशी जोडणाऱ्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरलाही मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना म्हणाले की, नवीन बेंगळुरू-मुंबई रेल्वे सेवा देशातील सर्वाधिक व्यस्त रेल्वेमार्गांपैकी एका मार्गावर प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध करून देईल. थानिसंद्रा येथे 270 कोटी रुपयांच्या खर्चातून वंदे भारत स्लीपर देखभाल केंद्र उभारले जाणार आहे, तर एसएमव्हीटी बेंगळुरूमध्ये 52.73 कोटी रुपयांच्या खर्चातून चेअर कार देखभाल सुविधा विकसित केली जाणार आहे.

ते म्हणाले की, बैयप्पनहल्ली-होसूर दुहेरीकरण, बेट्टाहलासुरू-राजनुकुंटे प्रकल्प तसेच बेंगळुरू परिसरातील चौपदरीकरणाच्या कामांमुळे रेल्वेची क्षमता वाढवली जात आहे. याशिवाय विविध महत्त्वाच्या रेल्वे विभागांमध्ये 6,396 कोटी रुपयांच्या खर्चातून स्वयंचलित सिग्नल प्रणाली विकसित केली जात आहे.

व्ही. सोमन्ना म्हणाले की, यंदा कर्नाटकला विक्रमी 7,748 कोटी रुपयांचा रेल्वे अर्थसंकल्पीय निधी मिळाला आहे. 2014 नंतर राज्यात 3,840 किलोमीटर रेल्वेमार्गांचा विकास करण्यात आला असून 3,742 किलोमीटर रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पुढील तीन वर्षांत सर्व समपातळी रेल्वे फाटक हटवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande