राज्यात उभारणार ‘कर्करोग ग्रीड’; उपचार सेवा अधिक सक्षम होणार – मुख्यमंत्री
पुणे, 17 मे (हिं.स.)। पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले
fades


पुणे, 17 मे (हिं.स.)।

पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात आयोजित लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उपमहापौर परशुराम वाडेकर तसेच महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून वेळेत निदान आणि उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचारात होणारा विलंब रुग्णांसाठी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठे संकट निर्माण करतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात ‘कर्करोग ग्रीड’ उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याद्वारे रुग्णांना अधिक सक्षम आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये समन्वय वाढवण्यासाठी हे ग्रीड महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयाची पाहणी करत विविध उपचार विभाग, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. कार्यक्रमास महानगरपालिकेचे पदाधिकारी, आपुलकी फाउंडेशनचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande