नागपूर मेट्रो बनली ‘फिरते पॉवर हाऊस’
ट्रॅकवर सौर ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली मेट्रो नागपूर, 17 मे (हिं.स.) : महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात नागपूर मेट्रोने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. प्रवासी वाहतुकीचे आधु
नागपूर मेट्रोच्या ट्रॅकवर लागलेल्या सोलर पॅनल्सचे छायाचित्र


ट्रॅकवर सौर ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली मेट्रो

नागपूर, 17 मे (हिं.स.) : महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात नागपूर मेट्रोने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. प्रवासी वाहतुकीचे आधुनिक साधन असलेली नागपूर मेट्रो आता “फिरते पॉवर हाऊस” बनली आहे. मेट्रोच्या रुळांच्या मधल्या जागेत आणि पिलर्सवर सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती करणारी ही महाराष्ट्रातील पहिली मेट्रो प्रणाली ठरली आहे.

नागपूर मेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (कॉर्पोरेट संचार) अखिलेश हळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनास मोठा हातभार लागणार आहे. केवळ 50 केडब्ल्यूपी क्षमतेच्या सौर प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 64 टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होणार आहे. हे प्रमाण जवळपास 2961 पूर्ण वाढलेल्या झाडांच्या समतुल्य मानले जात आहे.भारतातील इतर मेट्रो प्रकल्पांमध्ये स्थानकांच्या छतांवर सौर पॅनेल बसवले जात असले, तरी रेल्वे ट्रॅकच्या मधल्या जागेचा प्रभावी वापर करणारी नागपूर मेट्रो ही पहिलीच ठरली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने स्थानके आणि डेपोवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले असले तरी “ट्रॅक-माउंटेड सोलर सिस्टम” यशस्वीपणे राबवण्यात नागपूरने आघाडी घेतली आहे.

व्यवस्थापनाच्या दाव्यानुसार, ट्रॅकच्या मधोमध सौर पॅनेल बसवून मेट्रो चालवणारी ही जगातील पहिली प्रणाली आहे.या प्रकल्पाला “इंडो-जर्मन सोलर को-ऑपरेशन” अंतर्गत जर्मनीतून सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळत आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोला स्वतःचा निधी खर्च करावा लागलेला नाही. “झिरो इन्व्हेस्टमेंट मॉडेल” म्हणून हा प्रकल्प विशेष चर्चेत आहे.

मेट्रोला लागणाऱ्या एकूण विजेपैकी 50 ते 65 टक्के वीज सौर ऊर्जेतून मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. खापरी, न्यू एअरपोर्ट आणि एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्थानकांवर निर्माण होणारी अतिरिक्त वीज अर्थात महावितरणला पुरवली जात असून, त्यामुळे मेट्रोच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.

या प्रकल्पामुळे मेट्रोचा परिचालन खर्च कमी होणार असून, त्याचा थेट फायदा प्रवाशांना होण्याची शक्यता आहे. भविष्यात तिकीट दरांवरील वाढ नियंत्रणात ठेवण्यासही मदत होऊ शकते. “आत्मनिर्भर भारत” आणि “शाश्वत विकास” या संकल्पनांना बळ देणारा हा प्रकल्प भारतीय अभियांत्रिकी आणि परदेशी गुंतवणुकीचा उत्कृष्ट संगम मानला जात आहे.नागपूर मेट्रोच्या या यशस्वी प्रयोगानंतर आता पुणे मेट्रोमध्येही ट्रॅकवर सौर पॅनेल बसवण्याची तयारी सुरू झाली आहे. नागपूरचा हा “ग्रीन मेट्रो” पॅटर्न आता देशातील इतर शहरांसाठीही शाश्वत विकासाचा नवा आदर्श ठरत आहे.

महत्त्वाची आकडेवारी

वार्षिक वीज निर्मिती : सुमारे 70 हजार युनिट्स

प्रकल्प क्षमता : 50 केडब्ल्यूपी

अंदाजित प्रकल्प खर्च : 1 कोटी रुपये

पेबॅक पिरियड : 4 वर्षे

देखभाल : महिन्यातून दोनदा

कार्बन उत्सर्जनात घट : 64 टन प्रति वर्ष

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande