
नवी दिल्ली, १७ मे (हिं.स.)नीट-यूजी परीक्षेच्या पेपरफुटीवरून निर्माण झालेला राजकीय वाद अधिकच गडद होत चालला आहे. या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राहुल गांधींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, २०२४ आणि २०२६ या दोन्ही वर्षी नीट परीक्षेची पेपरफुटी झाली, परंतु शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. त्यांनी असा आरोप केला की, प्रत्येक वेळी तपास यंत्रणा आणि समित्या स्थापन करूनही परीक्षा पद्धतीत सुधारणा झालेली नाही.
राहुल गांधींनी म्हटले की, २०२४ मध्ये नीट परीक्षेची पेपरफुटी झाली, परंतु परीक्षा रद्द झाली नाही, मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही आणि तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. २०२६ मध्ये पेपरफुटी झाल्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली. सीबीआय पुन्हा तपास करत असून, दुसरी समिती स्थापन केली जात आहे. वारंवार होणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर सरकार गप्प का आहे, आणि सातत्याने अपयशी ठरलेल्या शिक्षणमंत्र्यांना त्यांच्या पदावरून का हटवले जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
नीट-यूजी २०२६ परीक्षा ३ मे रोजी झाली होती. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप समोर आल्यानंतर, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षा रद्द केली. त्यानंतर, केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवला. या तपास यंत्रणेने आतापर्यंत या प्रकरणात अनेक आरोपींना अटक केली आहे. प्रश्नपत्रिका फुटणे, उमेदवारांकडून खंडणी मागणे आणि विशेष कोचिंग सत्रांद्वारे प्रश्न पुरवणे यांसारख्या आरोपांची चौकशी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे