
नागपूर, 17 मे (हिं.स.)। लोकांचा सरकार आणि देव या दोन गोष्टींवर खुप विश्वास आहे. या दोघांनाही बाजूला करा, या मताचा मी पहिलेपासून आहे'. सरकार आणि देव, या दोघांनाही काम केले असते तर देश कधीचा बदलला असता. देशाला बदलायचे असेल तर व्यक्ती व समाजाला जागृत करा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. ‘शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय’ या विषयावर ही परिषद आयोजीत केली होती.
लोकसहभागातून कामे करून लोकजागृती करायला हवी. लोकसहभागातून मोठी कामे उभी राहातात हा आमचा २५ वर्षांचा आमचा अनुभव आहे. एका शेतकरी विधवेचे दु:ख पाहुन मन विषण्ण झाले. तेव्हाच शेतकऱ्यांसाठी काम करायचे असे ठरवले, असे ते म्हणाले.
राजकारण म्हणजे केवळ पाॅवर पाॅलिटिक्स नव्हे...
राजकारण म्हणजे केवळ पाॅवर पाॅलिटिक्स नव्हे. तर समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण करण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने काम करणाऱ्या नेत्याला पोस्टर व बॅनर लावण्याची, खाणेपीणे करण्याची गरज नाही. १५ वर्षांपासून खासदार आहो. पोस्टर, बॅनर लावणे बंद केले अाहे. अजेंडा माझा चालेल, तुमचा नाही', हे लोकांना सांगितले. लोक समजून घेतात हा माझा अनुभव आहे. लोक चांगले आहे. फक्त धाडस करायला हवे. विदर्भात पाण्याचे दुर्भिक्ष्य ही सर्वात मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी सिंचन सुविधा वाढवण्याची गरज आहे. एकीकडे पूर येत असताना गावात पिण्यासाठी पाणी नसल्याचे चित्र होते. हे बदलण्यासाठी पूर्ती सिंचन संस्थेची स्थापना केली.
सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला यावेळी पद्मभूषण व पद्मश्री डॉ. अनिल प्रकाश जोशी (देहरादून), पद्मश्री उमाशंकर पांडेय (उत्तर प्रदेश), पद्मश्री सेठपाल सिंग (सहारनपूर), ‘इंडिया पाँडमॅन’ रामवीर तंवर (नोयडा), सेंटर फॉर वॉटर पीसचे अध्यक्ष संजय कश्यप, आसामचे के. के. छत्रधारा, नागालँडच्या स्वेडेविनो नात्सो यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व अॅड. आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती होती.
आज जलक्रांती परिषद
उद्या सोमवार, १८ मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
चौकट
पण गरिबांचे काय?', म्हणत घोषणा
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात गोसेखुर्द प्रकल्पग्रस्ताने पण गरिबांचे काय?', म्हणत घोषणा दिल्याने काही काळ खळबळ माजली होती. हातात पोस्टर घेतलेल्या या व्यक्तीने तुम्ही सगळं सांगता. पण, गरिबांचे काय?' म्हणत घोषणा दिल्या. यामुळे क्षणभर गोंधळ निर्माण झाला. नितीन गडकरी यांनी त्याला भेटून समस्या सांगा', असे सांगितले. त्या नंतर लगेच पोलिस त्याला सभागृहाबाहेर घेऊन गेले. पेट्रोल, डिझेल भाववाढीने सध्या सामान्य नागरिक त्रस्त आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. यातून या प्रकल्पग्रस्ताने घोषणा देत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर