


रायपूर, 18 मे (हिं.स.)। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी माना पोलीस परेड ग्राउंड, रायपूर येथे छत्तीसगड पोलिसांच्या अत्याधुनिक ‘नेक्स्ट जेन सीजी डायल-112 सेवा’ आणि मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनचे उद्घाटन केले.
केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 400 अत्याधुनिक डायल-112 वाहने तसेच 32 मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय, विधानसभा अध्यक्ष रमन सिंह, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा, पोलीस महासंचालक अरुण देव गौतम, आमदार, जनप्रतिनिधी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
‘एक्के नंबर, सब्बो बर’ या संकल्पनेवर आधारित ही आधुनिक सेवा पोलीस, अग्निशमन आणि वैद्यकीय सेवा यांना एकत्रित करत नागरिकांना एका क्रमांकावर तातडीची आपत्कालीन मदत उपलब्ध करून देणार आहे. याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या 400 अत्याधुनिक वाहनांमध्ये स्मार्टफोन, जीपीएस, वायरलेस रेडिओ, पीटीझेड कॅमेरा, डॅश कॅम, मोबाइल एनव्हीआर आणि सोलर बॅकअप यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने घटनास्थळाचे लाईव्ह मॉनिटरिंग, रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि त्वरित संवाद सुनिश्चित केला जाणार आहे.
ही सेवा 24x7 कार्यरत राहणार असून, त्यामध्ये जीआयएस आधारित मॉनिटरिंग, अॅडव्हान्स वाहन ट्रॅकिंग, एसआयपी ट्रंक तंत्रज्ञान तसेच स्वयंचलित कॉलर लोकेशन ओळख यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. राज्यातील सर्व 33 जिल्हा समन्वय केंद्रांनाही या नेटवर्कशी जोडण्यात आले आहे. नागरिक व्हॉइस कॉल, एसएमएस, ई-मेल, वेब पोर्टल, व्हॉट्सअॅप, चॅटबॉट आणि एसओएस-112 इंडिया अॅपच्या माध्यमातूनही मदत मिळवू शकतील.
मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनमुळे घटनास्थळीच होणार वैज्ञानिक तपास
32 मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन राज्यातील गुन्हे अन्वेषणाला नवी दिशा देणार आहेत. “32 व्हॅन – 32 जिल्हे – एक संकल्प : अचूक तपास, त्वरित न्याय” या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे घटनास्थळीच प्राथमिक वैज्ञानिक तपासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रत्येक युनिटसाठी सुमारे 65 लाख रुपये खर्च असलेल्या या अत्याधुनिक व्हॅनमध्ये घटनास्थळ संरक्षण किट, पुरावे संकलन व सीलिंग उपकरणे, फिंगरप्रिंट डिटेक्शन सिस्टम, नार्कोटिक्स चाचणी किट, डिजिटल फॉरेन्सिक सपोर्ट, उच्च दर्जाची छायाचित्रण व्यवस्था, बुलेट होल स्क्रीनिंग आणि बॅलिस्टिक तपास किट तसेच गनशॉट रेसिड्यू (जीएसआर) चाचणी किट यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
या नवीन मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून घटनास्थळीच प्राथमिक तपास, पुरावा संरक्षण, चाचणी आणि डिजिटल दस्तऐवजीकरण करता येणार आहे. त्यामुळे तपासाची गुणवत्ता आणि गती या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule