
पालघर, 18 मे (हिं.स.) : येथील धानिवरी परिसरात मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणारे अंदाजे ३० ते ४० प्रवासी घेऊन जाणारा आयशर टेम्पो (नोंदणी क्रमांक MH 48 DC 7474) मुंबई-गुजरात मार्गावर चुकीच्या दिशेने जात होता. गावाजवळ पोहोचल्यावर समोरून येणाऱ्या ट्रेलरने (नोंदणी क्रमांक NL 01 AC 9118) नियंत्रण गमावले. ट्रेलरच्या कंटेनर बॉक्सने आयशर टेम्पोच्या डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. तसेच एक मोटारसायकल (नोंदणी क्रमांक MH 04 EM 8425) देखील या अपघातात सापडली.
या धडकेनंतर कंटेनरचा मागील भाग (डबा) अचानक वेगळा होऊन थेट वऱ्हाडींनी भरलेल्या ट्रकवर आदळला. या भीषण धडकेत ट्रकचा मागील भाग मोठ्या प्रमाणात वाकला आणि वाहनातील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. अपघातानंतर काही प्रवासी कंटेनरखाली अडकले तर काहीजण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर फेकले गेले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. १४ जखमींना तातडीच्या उपचारांसाठी डहाणू येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.
मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे : 1. सुरेश रत्ना लाखात, 2. पांडू गणपत लाखात, 3. काळू गोविंद लाखात, 4. सुनील अर्जुन दांडेकर, 5. चिमा गोविंद कुरहाडा, 6. नमिता विठ्ठल दांडेकर, 7. सारिका संतोष लाखात, 8. आयुष सिताराम लाखात, 9. सागर नामदेव शेंडे, 10. वंदना शिवराम वळवी, 11. सलोनी शिवराम वळवी, 12. अजय अहाडी, 13. रियांक्षी संतोष लाखात
जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणा घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी समन्वय साधत आहेत. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे पालघर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तपासातील पुढील माहिती तसेच जखमींच्या प्रकृतीबाबतची अद्ययावत माहिती वेळोवेळी देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अथवा संबंधित माहिती देण्यासाठी नातेवाईकांनी डॉ. सचिन वाघमारे यांच्याशी ९४२१४८५५०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी