
एकूण 3 विद्यार्थ्यांच्या घरांची घेतली झाडाझडती
नागपूर, 19 मे (हिं.स.) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, मंगळवारी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठी कारवाई केली. सीबीआयच्या विशेष पथकाने नागपुरातील दोन विद्यार्थीनींसह चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील एका विद्यार्थ्याच्या घरावर छापे टाकून झाडाझडती घेतली. या कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, हस्तलिखित नोट्स तसेच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नीटच्या जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र विषयांचे पेपर फुटल्याच्या आरोपांप्रकरणी सीबीआयच्या नवी दिल्ली येथील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी पेपरफूट प्रकरणी लातूरच्या ‘आरसीसी क्लासेस’चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले होते.तपासादरम्यान सीबीआयला काही संशयित विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकांची माहिती मिळाल्यानंतर नागपूरमध्ये ही शोधमोहीम राबवण्यात आली. स्थानिक पोलिसांना पूर्वसूचना न देता ही गुप्त कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का, याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे.
सीबीआयच्या प्राथमिक अंदाजानुसार, देशभरातील किमान एक हजार विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असावेत. नागपूर आणि चंद्रपूरातील विद्यार्थ्यांनी हे पेपर विकत घेतले होते का, त्यांनी ते इतरांना पाठवले होते का, याचाही तपास सुरू आहे.कारवाईदरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज, हॉल तिकीट, मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच पालकांच्या बँक खात्यांची माहिती तपासण्यात आली. पेपर लीक, गुणांमध्ये फेरफार किंवा आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून प्रवेश मिळवून देणाऱ्या आंतरराज्य रॅकेटशी या विद्यार्थ्यांचा संबंध आहे का, याचा शोध सीबीआय घेत आहे.
याशिवाय विदर्भातील काही कोचिंग क्लासेसचे एजंट किंवा दलाल या गैरप्रकारात सक्रिय होते का, याचाही तपास सुरू आहे.
दरम्यान, पेपरफुटीचे मुख्य केंद्र सध्या तरी नागपूर नसल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.
देशभरात आधीच ‘नीट’ परीक्षा घोटाळ्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असताना, विदर्भातील या कारवाईमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. आगामी काळात आणखी काही ठिकाणी छापेमारी होण्याची शक्यता सीबीआयने नाकारलेली नाही.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी