
- मंदिरांच्या सुवर्ण साठ्यांचे मुद्रीकरण होणार असल्याच्या खोट्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण
नवी दिल्ली, 19 मे (हिं.स.)। केंद्र सरकार मंदिरांमधील सोन्याच्या साठ्याच्या बदल्यात मंदिरांना सुवर्ण रोखे (Gold Bonds) जारी करण्याचा विचार करत आहे किंवा मंदिरांच्या सोन्याच्या साठ्याचे मुद्रीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, असे दावे करणाऱ्या काही बातम्या प्रसारमाध्यमांमधून आणि सोशल मीडिया पोस्ट्समधून फिरत आहेत. देशातील मंदिर विश्वस्त संस्था किंवा कोणत्याही धार्मिक संस्थांकडे असलेल्या सोन्यासाठी मुद्रीकरण योजना सुरू करण्याचा सरकार विचार करत असल्याचे अंदाज आणि अफवा पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि कोणताही आधार नसलेल्या आहेत.
यासोबतच, मंदिरांचे कळस, दरवाजे किंवा मंदिरांच्या इतर वास्तूंवरील सोन्याच्या पट्ट्या म्हणजे 'भारताचा धोरणात्मक सोन्याचा साठा' (Strategic Gold Reserves of India) मानला जाईल, असे सुचवणारे दावे देखील खोटे, दिशाभूल करणारे आणि पूर्णपणे तथ्यहीन आहेत, असे स्पष्ट करण्यात येत आहे.नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा त्या पसरवू नयेत. पडताळणी न केलेली माहिती पसरवल्याने अनावश्यक संभ्रम निर्माण होतो आणि जनतेची दिशाभूल होऊ शकते.
सरकार सर्व नागरिकांना आवाहन करते की त्यांनी केवळ अधिकृत माध्यमांद्वारे जारी केलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. धोरणात्मक निर्णय किंवा सरकारी योजनांविषयीची कोणतीही माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रके, सरकारी संकेतस्थळे आणि पडताळणी केलेल्या सार्वजनिक संवाद मंचांद्वारे सामायिक केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule