
जगदलपूर, 19 मे (हिं.स.) : बस्तरमध्ये आता भीतीचे वातावरण संपले असून नागरिकांमध्ये विश्वास, उत्साह आणि भविष्यासाठी आशा निर्माण झाली आहे. बस्तर आता मोकळा श्वास घेत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. शाह यांनी आज, मंगळवारी छत्तीसगडच्या जगदलपूर येथे आयोजित कार्यक्रमात बस्तरला अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित केले. या यशाचे श्रेय त्यांनी राज्यातील भाजप सरकार आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नांना दिले.
बस्तरच्या नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भविष्याच्या आशादायी चित्रावर बोलताना शाह म्हणाले की, 13 डिसेंबर 2023 रोजी विष्णुदेव साय यांच्या नेतृत्वाखाली छत्तीसगडमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर नक्षलवाद संपवण्यासाठी निर्णायक पावले उचलण्यात आली. त्यांनी काँग्रेसवर आरोप करत म्हटले की नक्षलविरोधी मोहिमेत अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. दोन वर्षांपूर्वी 24 ऑगस्ट 2024 रोजी डीजीपींच्या बैठकीनंतर 31 मार्च 2026 पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, मात्र सुरक्षा दलांच्या शौर्यामुळे ते उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण झाल्याचे समाधान शाह यांनी व्यक्त केले. नक्षलवादामुळे केवळ विकासच थांबला असे नव्हते, तर नक्षलवादामुळेच अनेक भागांमध्ये विकास पोहोचू शकला नाही. आता नक्षल प्रभावित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची नवीन योजना सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.बस्तरमध्ये विकासाच्या नव्या युगाची सुरुवात झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी