
नवी दिल्ली, 19 मे (हिं.स.) : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशात अवघ्या एका आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे ९१ पैशांची वाढ जाहीर केली. यापूर्वी १५ मे रोजी इंधनाच्या दरात तब्बल ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
नवीन दरवाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ८७ पैशांनी वाढून ९८.६४ रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा दर ९१ पैशांनी वाढून ९१.५८ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.
देशातील प्रमुख महानगरांमध्येही इंधन दरवाढीचा परिणाम दिसून आला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर ९१ पैशांनी वाढून १०७.५९ रुपये प्रति लिटर झाला असून डिझेल ९४ पैशांनी महाग होऊन ९४.०८ रुपये प्रति लिटर झाले आहे.
कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात सर्वाधिक ९६ पैशांची वाढ झाली असून तेथे पेट्रोलचा दर १०९.७० रुपये प्रति लिटर झाला आहे. डिझेलचा दरही ९४ पैशांनी वाढून ९६.०७ रुपये प्रति लिटर झाला आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल ८२ पैशांनी महाग होऊन १०४.४९ रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेलचा दर ८६ पैशांनी वाढून ९६.११ रुपये प्रति लिटरवर गेला आहे.
प्रमुख शहरांतील पेट्रोलचे नवे दर:
दिल्ली – ९८.६४ रुपये
मुंबई – १०७.५९ रुपये
कोलकाता – १०९.७० रुपये
चेन्नई – १०४.४९ रुपये
प्रमुख शहरांतील डिझेलचे नवे दर:
दिल्ली – ९१.५८ रुपये
मुंबई – ९४.०८ रुपये
कोलकाता – ९६.०७ रुपये
चेन्नई – ९६.११ रुपये
दरम्यान, इराणमधील संघर्षामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्या गेल्या अनेक आठवड्यांपासून जुन्या दरानेच इंधन विक्री करत होत्या. मात्र वाढत्या खर्चामुळे कंपन्यांवरील आर्थिक ताण वाढल्याने इंधन दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे सांगितले जात आहे.
इंधन दरवाढीचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्य, भाजीपाला, सार्वजनिक वाहतूक तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर आणखी वाढल्यास आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे महागाई वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.--------------------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule