

बंगळूर, 19 मे (हिं.स.)। कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील प्रसिद्ध दुबारे हत्ती कॅम्पमध्ये घडलेल्या भीषण दुर्घटनेने पर्यटक आणि वन विभाग हादरला आहे. दोन प्रशिक्षित हत्तींमध्ये अचानक झालेल्या झुंजीदरम्यान एका महिला पर्यटकाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ‘मार्थांडा’ या हत्तीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोमवारी कावेरी नदीकाठी हत्तींना आंघोळ घालण्याचे काम सुरू असताना ‘कंजन’ आणि ‘मार्थांडा’ या दोन हत्तींमध्ये अचानक आक्रमक झटापट सुरू झाली. त्या वेळी अनेक पर्यटक नदीकिनारी उभे राहून हा देखावा पाहत होते. चेन्नईतील पल्लवरम परिसरातील जिनसू ही ३३ वर्षीय महिला आपल्या पती आणि चिमुरड्या मुलीसह दुबारे कॅम्पला भेट देण्यासाठी आली होती. ती नदीकिनारी उभी राहून हत्तींना आंघोळ घालताना पाहत असतानाच दोन हत्ती एकमेकांवर धावून गेले.
वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, माहूतांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘कंजन’ने ‘मार्थांडा’वर जोरदार हल्ला केला. या संघर्षात ‘मार्थांडा’चा तोल गेला आणि तो थेट जिनसूवर कोसळला. ती हत्तीखाली अडकली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. तिचे पती आणि मुलगी थोडक्यात बचावले. घटनास्थळी उपस्थित काही पर्यटकांनी या संपूर्ण घटनेचे चित्रिकरण केले असून त्यामध्ये महिलेचा पती मुलाला हातात घेऊन पत्नीला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे.
या झटापटीत ‘मार्थांडा’च्या पोट आणि पायाजवळ गंभीर दुखापती झाल्या होत्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुजीब आणि चेट्टियप्पा यांनी त्याच्यावर उपचार केले, मात्र अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उपवनसंरक्षक अभिषेक यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना दुबारे कॅम्पमध्ये अत्यंत दुर्मिळ आहेत. एका हत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधारणपणे पाच जणांची आवश्यकता असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेनंतर कर्नाटक सरकारने दुबारे हत्ती कॅम्प दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. वन, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र मंत्री ईश्वर खंड्रे यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले असून राज्यातील सर्व हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या नियमांनुसार पर्यटकांना आता हत्तींची आंघोळ किमान शंभर फूट अंतरावरूनच पाहता येणार आहे. तसेच हत्तींना स्पर्श करणे, जवळ जाऊन छायाचित्र काढणे, त्यांना आंघोळ घालणे किंवा केळी, ऊस आणि गूळ यांसारखे पदार्थ हाताने खाऊ घालण्यास बंदी घालण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule