
अमरावती, 02 मे (हिं.स.) : निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरावलोकन कार्यक्रमांतर्गत राज्यभर मतदार यादी पडताळणी मोहीम
(एसआयआर) सध्या सुरू असून, या प्रक्रियेमुळे अनेक नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विवाहानंतर सासरी गेलेल्या महिलांना जुनी नोंदी शोधण्यासाठी माहेर गाठावे लागत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
२०२४ च्या अद्ययावत मतदार यादीचे २००२ मधील जुन्या यादीशी मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. या प्रक्रियेत जुन्या नोंदी आवश्यक ठरत असल्याने नागरिकांना पूर्वीचे पुरावे सादर करणे बंधनकारक झाले आहे. अनेक प्रकरणांत जुनी माहिती उपलब्ध नसल्यास नाव वगळले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बीएलओ (Booth Level Officer) यांच्याकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. काही ठिकाणी अपूर्ण माहितीमुळे पुनर्पडताळणीची गरज भासत असून, प्रशासनाकडून ही प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.
निवडणूक आयोगाच्या मते, ही मोहीम मतदार यादी शुद्ध आणि अचूक करण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे. मात्र, आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास संबंधित मतदारांचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, जुने मतदार ओळखपत्र, राहण्याचा पुरावा तसेच विवाह प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. यासंदर्भात बीएलओ नागरिकांकडून माहिती घेत असून, प्रशासनाने नागरिकांना तातडीने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी