उष्णतेचा तडाखा आणि घसरलेले दर; भाजीपाला व फळपिकांवर दुहेरी संकट
अमरावती, 02 मे (हिं.स.)। पश्चिम विदर्भासह परिसरात वाढलेल्या प्रचंड उष्णतेचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळपिकांना बसत असून टोमॅटो, टरबूज, पपई, वांगे आणि कांदा या पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एकीकडे उष्णतेमुळे पिकांचे नुकसान होत असताना दुस
उष्णतेचा तडाखा आणि घसरलेले दर; भाजीपाला व फळपिकांवर दुहेरी संकट


अमरावती, 02 मे (हिं.स.)। पश्चिम विदर्भासह परिसरात वाढलेल्या प्रचंड उष्णतेचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळपिकांना बसत असून टोमॅटो, टरबूज, पपई, वांगे आणि कांदा या पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. एकीकडे उष्णतेमुळे पिकांचे नुकसान होत असताना दुसरीकडे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

टरबूज पिकावर उष्णतेचा मोठा परिणाम दिसून येत असून फळांवर पांढरे डाग पडत आहेत, तर वेली सुकत आहेत. टरबूजाला सध्या केवळ चार रुपये किलो असा ठोक भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. टोमॅटोची परिस्थितीही तितकीच गंभीर असून २५ किलोच्या क्रेटला अवघे १०० रुपये दर मिळत आहे. तोडणी व वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणी बंद केली आहे.

वांग्याला २० किलो पन्नीमागे ३० ते ४० रुपये दर मिळत असून यातूनही खर्च भागत नाही. पपईसारख्या नाजूक पिकाला एक ते दोन रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.रखरखत्या उन्हात पिकांची देखभाल, पाणीपुरवठा आणि तोडणीसाठी मोठी मेहनत घ्यावी लागत असतानाही बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. अनेक ठिकाणी पिके शेतातच पडून राहत असून काही ठिकाणी जंगली प्राण्यांकडूनही नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande