
अमरावती, 02 मे (हिं.स.)
आखाती भागात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, त्याचा थेट फटका जिल्ह्यातील रस्तेनिर्मिती आणि दुरुस्तीच्या कामांना बसत आहे. डांबर, फर्नेस ऑइलसह विविध पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे बांधकाम क्षेत्रातील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी अनेक रस्ते प्रकल्पांचा वेग मंदावला असून, काही कामे थंडावण्याच्या मार्गावर आहेत.
आखाती युद्धामुळे आयात साखळी विस्कळीत झाली आहे. डांबरासारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालाचा पुरवठा घटल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे कंत्राटदारांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे ठाकले आहे. जुन्या दराने घेतलेली कामे सध्याच्या वाढीव खर्चात पूर्ण करणे कठीण होत असल्याने अनेक कंत्राटदारांनी कामाचा वेग कमी केला आहे.
दरम्यान, पेट्रोलियम उत्पादनांच्या दरवाढीचा परिणाम फक्त डांबरापुरता मर्यादित नसून वाहतूक खर्च, यंत्रसामग्री वापर आणि मजुरीवरही झाला आहे. त्यामुळे प्रकल्पांचा एकूण खर्च गगनाला भिडला आहे. सरकारकडून मंजूर झालेल्या निधीमध्ये काम पूर्ण करणे अवघड बनले असून, निधी पुनर्मूल्यांकनाची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या रस्तेबांधणी प्रकल्पांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू असून, काही ठिकाणी कामे थांबण्याच्या स्थितीत आहेत. कंत्राटदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने ते नवीन कामे स्वीकारण्यासही मागे हटत आहेत.
विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी रस्त्यांची डागडुजी यंदा धोक्यात आली आहे. खड्डे बुजविणे, डांबर टाकणे यांसारखी नियमित कामे दरवाढीमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना खड्डेमय रस्त्यांचा अधिक त्रास सहन करावा लागू शकतो.
सध्या बांधकाम विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, उपलब्ध निधी असलेल्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. मात्र युद्धस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास रस्ते प्रकल्प पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना करून दरवाढीचा ताण कमी करावा, अशी मागणी नागरिक आणि कंत्राटदारांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी