अमरावती विद्यापीठ : डिजिटल व्हॅल्युएशन प्रणालीमुळे निकाल ४५ दिवसांत
अमरावती, 02 मे (हिं.स.) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठने परीक्षा व निकाल प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी ‘डिजिटल व्हॅल्युएशन’ प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीमुळे पारंपरिक उत्तरपत्रिका तपासणीऐवजी डि
डिजिटल व्हॅल्युएशनकडे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा मोठा टप्पा; ४५ दिवसांत निकालाचे लक्ष्य


अमरावती, 02 मे (हिं.स.) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठने परीक्षा व निकाल प्रक्रियेत पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी ‘डिजिटल व्हॅल्युएशन’ प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीमुळे पारंपरिक उत्तरपत्रिका तपासणीऐवजी डिजिटल पद्धतीने मूल्यांकन केले जाणार असून, निकाल अवघ्या ४५ दिवसांत जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विद्यापीठ प्रशासनाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) योजनेअंतर्गत अत्याधुनिक डिजिटल मूल्यांकन केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी ३० एप्रिल रोजी ई-निविदा काढण्यात आली असून, परीक्षा व्यवस्थापनात मोठा बदल अपेक्षित आहे.

नवीन प्रणालीअंतर्गत उत्तरपत्रिका प्रथम स्कॅन करून त्यांची डिजिटल प्रत तयार केली जाईल. त्यानंतर या प्रती संगणकाद्वारे विषयतज्ज्ञ प्राध्यापकांकडे पाठवण्यात येतील. त्यामुळे प्राध्यापकांना अमरावती येथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही; ते आपल्या नजीकच्या केंद्रातून किंवा अधिकृत ऑनलाइन माध्यमातून उत्तरपत्रिका तपासू शकतील.

अमरावतीसह अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्यांत स्वतंत्र डिजिटल व्हॅल्युएशन केंद्रे उभारली जाणार असून, ती प्रामुख्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये स्थापन केली जातील. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव अविनाश असनारे यांच्या समन्वयातून ही प्रणाली राबवली जात आहे.

डिजिटल व्हॅल्युएशनमुळे मानवी चुका टाळण्यास मदत होणार आहे. गुणांची बेरीज करताना होणाऱ्या त्रुटी किंवा एखादा प्रश्न तपासला न जाणे अशा समस्या आता कमी होतील. ऑनलाइन तपासणीमुळे निकाल प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता वाढेल.

विद्यार्थ्यांसाठीही ही प्रणाली लाभदायक ठरणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत थेट ई-मेलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रती मिळवण्यासाठी होणारी प्रतीक्षा संपणार आहे. वेळेत निकाल लागल्यामुळे प्लेसमेंट, परदेशी शिक्षणासाठी अर्ज तसेच पुढील प्रवेश प्रक्रियेत विलंब होणार नाही.

‘मिशन ४५ दिवस’ अंतर्गत परीक्षेनंतर ४५ दिवसांत निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परीक्षा नियंत्रक संचालक डॉ. नितीन कोळी यांनी सांगितले की, “डिजिटल व्हॅल्युएशनमुळे निर्धारित वेळेत निकाल जाहीर करणे शक्य होईल. यामुळे पारदर्शकता, अचूकता आणि वेग या तिन्ही बाबींमध्ये सुधारणा होईल.”

एकूणच, विद्यापीठाचा हा निर्णय परीक्षा व्यवस्थापनात आधुनिकतेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, विद्यार्थ्यांसाठी तो दिलासादायक ठरणार आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande