
अमरावती, 02 मे (हिं.स.)।
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना स्वस्त व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने ‘नाथजल’ या बाटलीबंद पाण्याची योजना सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात बसस्थानकांवर याचे चित्र वेगळेच दिसत आहे. अनेक ठिकाणी ‘नाथजल’चा पुरवठा वेळेवर होत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर ज्या ठिकाणी हे पाणी उपलब्ध आहे, तिथे अधिकृत १५ रुपयांऐवजी २० रुपये आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.महामंडळाने ‘नाथजल’ची १५ रुपयांची निश्चित किंमत ठरवून इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीस मनाई केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक बसस्थानके आणि थांब्यांवर नाथजल उपलब्ध नसल्याने विक्रेते इतर कंपन्यांचे पाणी विकताना दिसतात. त्यामुळे प्रवाशांना पर्याय नसल्याने जादा दराने पाणी घ्यावे लागत आहे.विशेष म्हणजे, काही ठिकाणी ‘कुलिंग चार्ज’च्या नावाखाली अतिरिक्त ५ रुपये आकारले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. परंतु, बाटलीबंद पाण्यावर छापलेल्या एमआरपीपेक्षा अधिक दर घेणे नियमबाह्य असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून, प्रशासनाच्या नियंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.प्रवाशांच्या तक्रारींसाठी एसटी महामंडळाने २४ तास हेल्पलाइन (१८०० २२ १२५०) सुरू ठेवली आहे. नाथजल उपलब्ध नसणे किंवा जादा दराने विक्री होत असल्यास प्रवाशांनी बसस्थानकाचे नाव, स्टॉलची माहिती व तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्रशासनाने नाथजलची सक्ती केली असली, तरी त्याचा नियमित पुरवठा आणि ठरलेल्या दरात विक्री सुनिश्चित करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अन्यथा, प्रवाशांची होणारी आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी कडक कारवाईची मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी