
अमरावती, 02 मे (हिं.स.) : उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांचा अभ्यासाशी असलेला संपर्क तुटू नये आणि शैक्षणिक सातत्य टिकून राहावे, यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना ‘कार्यपुस्तिका’ (वर्कबुक) देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अमरावती जिल्ह्यात तब्बल ५२ हजार कार्यपुस्तिकांचे वितरण करण्यात आले आहे.
उन्हाळी सुटीदरम्यान शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती खंडित होऊ नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. वाचन, लेखन आणि गणितीय कौशल्ये विकसित करण्यासाठी या कार्यपुस्तिका विशेषतः तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना या पुस्तिका घरी सोडवण्यासाठी देण्यात येत असून, त्यामुळे सुटीतही अभ्यासाची उजळणी करण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या कार्यपुस्तिकांचे वितरण पूर्ण झाले असून, अनेक विद्यार्थ्यांनी त्यावर सराव सुरू केला आहे. या उपक्रमामुळे मुलांच्या अभ्यासात खंड पडणार नाही, अशी सकारात्मक प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.
नवीन सत्रात शिक्षक घेणार प्रगतीचा आढावा
कार्यपुस्तिकांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम, कोडी आणि सरावासाठी प्रश्नांचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे तर्कशक्ती आणि भाषिक कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. या पुस्तिका अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत की, विद्यार्थी त्या घरी पालकांच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतःही पूर्ण करू शकतील.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी