
रायगड, 20 मे (हिं.स.)। अलिबाग : शेअर बाजारात गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी अलिबागमधील एका व्यक्तीची तब्बल ६६ लाख ५४ हजार ३६३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिवनगर, चेंढरे (ता. अलिबाग) येथील रहिवासी असून १३ फेब्रुवारी २०२६ ते ११ मे २०२६ या कालावधीत अज्ञात आरोपींनी फेसबुकवर लिंक पाठवून त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होतो, असा बनावट डेमो दाखवून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.यानंतर आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडत टप्प्याटप्प्याने तब्बल ६६ लाख ५४ हजार ३६३ रुपये उकळले. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(डी) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)