वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून माणगावात दोन कुटुंबांत हाणामारी, आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
रायगड, 21 मे (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील उसर बुद्रक बौद्धवाडी येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी आठ जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकड
Clashes between two families in Mangaon over ancestral land dispute


रायगड, 21 मे (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील उसर बुद्रक बौद्धवाडी येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी आठ जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 20 मे 2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या घराच्या अंगणात हा प्रकार घडला. वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून सुरू असलेल्या वादातून आरोपी क्रमांक 1 ते 8 यांनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांच्या घरात प्रवेश केला आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी फिर्यादी यांच्या बहिणीने विरोध केल्याने आरोपींनी तिच्यावर हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे आई-वडील हे सोडवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही बेदम मारहाण केली. आरोपींनी महिलांचे केस ओढून त्यांना जमिनीवर ढकलल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

तसेच फिर्यादी यांच्या वडिलांच्या छातीत बुक्का मारून कंबरेत लाथ मारण्यात आली, तर फिर्यादी यांच्या बोटाला चावा घेऊन कानशिलात मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 148/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 115(2), 352, 351(2), 189(2), 190 आणि 329(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चिकणे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande