गडचिरोली : बनावट नोटा रॅकेटचा भंडाफोड; नागपूरमध्ये छापा, चौघे अटकेत
गडचिरोली, 21 मे (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचा मोठा आणि धक्कादायक गैरव्यवहार उघडकीस आला असून, पोलिसांनी नागपूरमध्ये छापा टाकत आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बनावट नोटा छापण्याचे साहित्य, अर्धवट नोटा आणि हायटेक उप
बनावट नोटांचे रॅकेट आरोपी सह पोलीस


गडचिरोली, 21 मे (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात बनावट चलनी नोटांचा मोठा आणि धक्कादायक गैरव्यवहार उघडकीस आला असून, पोलिसांनी नागपूरमध्ये छापा टाकत आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बनावट नोटा छापण्याचे साहित्य, अर्धवट नोटा आणि हायटेक उपकरणे जप्त करण्यात आली असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.ही कारवाई गडचिरोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) संयुक्त पथकाने केली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या गडचिरोली शाखेतील एटीएम डिपॉझिट मशीनमध्ये बनावट नोटा आढळल्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला. बँक व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून 15 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका आरोपीने 100 रुपयांच्या 21 बनावट नोटा एटीएममध्ये जमा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी 23 वर्षीय प्रमोद टिकाराम कोवे याला अटक केली.चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूरच्या त्रिमूर्ती नगर परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकला. तेथे बनावट नोटा छापण्याचे संपूर्ण यंत्रणा कार्यरत असल्याचे आढळून आले.या कारवाईत हायटेक कलर प्रिंटर, संगणक उपकरणे, बॉण्ड पेपर, कटर, अर्धवट छापलेल्या नोटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे.अटक आरोपींवर बनावट नोटा छपाई व वितरणाचे गंभीर आरोप असून त्यांना 22 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.प्राथमिक तपासात या प्रकरणामागे आंतरजिल्हा बनावट नोटा रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिसांनी अंदाजे 39,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात तयार आणि अर्धवट छापलेल्या बनावट नोटा तसेच प्रिंटिंग मशीन व साहित्याचा समावेश आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण करत आहेत.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande