
सोलापूर, 20 मे (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या शासकीय स्टोअरमधील भंगार चोरीप्रकरणी अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडेयांच्यासह सहा जणांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.महापालिकेच्या स्टोअरमधून भंगार चोरी झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सोमवारी रात्री उशिरापर्यंत राजकीय नेते आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सदर बाजार पोलीस ठाण्यात उपस्थित होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेआणि काँग्रेस शहराध्यक्षचेतन नरोटेयांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दीर्घ चर्चेनंतर अखेर शासकीय साहित्य चोरीप्रकरणी जगन्नाथ बनसोडे आणि त्यांच्या इतर पाच साथीदारांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.या प्रकरणात महापालिकेच्या स्टोअरमधून नेमके किती किमतीचे भंगार चोरीला गेले, तसेच या प्रकारात आणखी कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा तपास आता सदर बाजार पोलीस करत आहेत.मनपाच्या जबाबदार विभागप्रमुखावरच चोरीचा गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाकडे शहराचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड