
रत्नागिरी, 20 मे (हिं.स.) । राजापूर शहरानजीकच्या कोदवली पुनर्वसन वसाहतीतील हॉटेल फुडलँड येथून ग्राहक नोंदणी रजिस्टर घेऊन पसार झालेल्या चार संशयितांनी वापरलेली मोटारी तुरळ (ता. संगमेश्वर) येथे सावर्डे पोलिसांनी जप्त केली आहे.
या मोटारीतून पाच मोबाइल तसेच विविध हॉटेलांची ग्राहक नोंदणीची सहा रजिस्टर आढळून आल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. राजापूर, संगमेश्वर आणि सावर्डे पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास चार संशयित तरुण हॉटेल फुडलँड येथे रूम पाहण्याच्या बहाण्याने आले होते. त्यांनी हॉटेलमधील ग्राहक नोंदणी रजिस्टर घेऊन पोबारा केला. यावेळी हॉटेलमधून सुमारे सहा हजार रुपयांची रोकडही लंपास करण्यात आली.
या घटनेनंतर राजापूर पोलिसांनी तपास सुरू केला असताना धामणी (ता. संगमेश्वर) येथील एका हॉटेलमध्येही अशाच प्रकारची घटना घडली. तेथेही संशयितांनी ग्राहक नोंदणी रजिस्टर आणि सुमारे साडेपाच हजार रुपयांची रोकड घेऊन पलायन केले. हॉटेल मालकाने तातडीने संगमेश्वर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी नाकेबंदीचे आदेश दिले. त्याची माहिती मिळताच संशयितांनी वापरलेली निळ्या रंगाची हुंडाई कार (क्र. केओ ५१ एमजी ६९०५) महामार्गावरील तुरळ येथे सोडून पलायन केले. सावर्डे पोलीस ठाण्याचे निरीक्षक आबासो पाटील यांनी तत्काळ मोटार ताब्यात घेतली. तपासादरम्यान गाडीत पाच मोबाइल फोन आणि आंबोली, सावंतवाडी, कणकवली, संगमेश्वर आदी भागांतील हॉटेलांची ग्राहक नोंदणी पुस्तके आढळली. ती जप्त करण्यात आली. राजापुरातील फुडलँड हॉटेलचे रजिस्टर महामार्गालगत फेकून दिल्याचे आढळले.
या प्रकरणी राजापूर व संगमेश्वर पोलिसांनी चारही संशयितांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांचा हेतू केवळ चोरीपुरता नसून हॉटेलमधील नोंदणी माहिती मिळविण्याचाही असू शकतो. त्यामुळे या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
दरम्यान, संशयितांनी वापरलेली मोटार कर्नाटक राज्यातील असून संबंधित मोबाइल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी