जळगावात लाचखोर जिल्हा उपनिबंधक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव, २० मे (हिं.स.) : सहकारी संस्थेच्या चौकशी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव येथील जिल्हा उपनिबंधकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. तडजोडीनंतर ३ लाख रु
एफआईआर लोगो


जळगाव, २० मे (हिं.स.) : सहकारी संस्थेच्या चौकशी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव येथील जिल्हा उपनिबंधकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. तडजोडीनंतर ३ लाख रुपयांवर व्यवहार ठरला होता. त्यातील पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव जगदीश बाबूराव बारी (वय ५३) असे असून ते जळगाव येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. तर देविदास धनसिंग पाटील (वय ४८, रा. जळगाव) या खासगी व्यक्तीलाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशी प्रकरणाची सुनावणी उपनिबंधक जगदीश बारी यांच्याकडे सुरू होती. तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये तसेच चौकशीचा अहवाल त्यांच्या बाजूने पाठविण्यासाठी बारी यांनी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ मे रोजी जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने १८ आणि १९ मे रोजी पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. पुढे तडजोडीनंतर लाचेची रक्कम ३ लाख रुपये निश्चित करण्यात आली.

आज, २० मे रोजी एसीबीच्या पथकाने उपनिबंधक कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे देविदास पाटील यांनी उपनिबंधक बारी यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही रंगेहात पकडले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande