
रायगड, 20 मे (हिं.स.) : भोर तालुक्यातील बारे खुर्द येथून ठाणे (कळवा) येथे एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून तब्बल 9 लाख 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तळेगाव ते मिसिंग लिंक बोगदा दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान तळेगाव ते मिसिंग लिंक बोगदा परिसरात त्यांना झोप लागली. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने तसेच मुलीचे दागिने ठेवलेला डबा चोरून नेला.
बस खोपोलीतील फूडमॉल परिसरात आल्यानंतर महिलेने पर्सची तपासणी केली असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. चोरीस गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत 9 लाख 45 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 184/2026 नुसार बीएनएस 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन हिरे करीत आहेत.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)