
कोलकाता, 21 मे (हिं.स.) - आयपीएल २०२६ च्या ६५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने केलेला रागाचा उद्रेक महागात पडला. कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर, बीसीसीआयने मुंबईचा कर्णधार पांड्याला शिक्षा केली आहे. बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर यजमानांविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयपीएलच्या 'खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी आचारसंहिते'च्या स्तर १ चे उल्लंघन केल्याबद्दल पांड्याला शिक्षा झाली. त्याला त्याच्या सामना शुल्काच्या १० टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.
हार्दिक पंड्याने आपली चूक कबूल केली असून सामनाधिकारी राजीव सेठ यांनी लावलेली शिक्षा स्वीकारली आहे. नियमांनुसार, चार ते सात डिमेरिट पॉइंट्स असलेल्या क्रिकेटपटूला एका सामन्यासाठी निलंबित केले जाऊ शकते. त्यामुळे, हार्दिकला आता पुढे सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
आयपीएल २०२६ चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक ठरला आहे. पाच वेळचा विजेता संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. कोलकाताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने १४७ धावा केल्या, पण कोलकाता नाईट रायडर्सने सात चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य पूर्ण केले. हार्दिक पांड्या गोलंदाजीत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला, त्याने दोन षटकांत १३ धावा दिल्या आणि त्याला एकही बळी मिळाला नाही. मुंबई इंडियन्स आपला शेवटचा साखळी सामना रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे