भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकण्याची सवय लावायची आहे: हरमनप्रीत कौर
नवी दिल्ली, २१ मे (हिं.स.)आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) महिला टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने एक मोठे विधान केले आहे. तिने म्हटले आहे की, भारतीय संघ आता केवळ एकदा विश्वचषक जिंकून समाधानी
हरमनप्रीत कौर


नवी दिल्ली, २१ मे (हिं.स.)आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) महिला टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने एक मोठे विधान केले आहे. तिने म्हटले आहे की, भारतीय संघ आता केवळ एकदा विश्वचषक जिंकून समाधानी नाही, तर त्यांना ही एक सवय लावायची आहे.

हरमनप्रीत म्हणाली की, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ जिंकणे हा भारतीय महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण होता. ती म्हणाली की, हे केवळ एक ट्रॉफी जिंकण्यापुरते नव्हते, तर यामुळे देशातील तरुण मुलींना आत्मविश्वास मिळाला की त्यासुद्धा जगातील सर्वात मोठ्या मंचावर पोहोचू शकतात. २०२५ च्या विश्वचषक विजयाने आम्हाला आत्मविश्वास दिला, पण ती फक्त सुरुवात होती. आता आम्ही विजयाला आमची ओळख बनवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्या यशानंतर जबाबदाऱ्या आणि अपेक्षा दोन्ही वाढल्या आहेत. निश्चितच दबाव आहे, पण तो सकारात्मक दबाव आहे, असे हरमनप्रीतने सांगितले.

भारतीय कर्णधाराने सांगितले की, २०२५ चा विश्वचषक जिंकल्यानंतर संघाने लगेचच टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू केली. ती म्हणाली की, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकांमुळे संघाला आपल्या कमकुवत आणि मजबूत बाजू समजून घेण्याची संधी मिळाली. हरमनप्रीतने संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयच्या तयारीचेही कौतुक केले. ती म्हणाली की, बंगळूरुमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आयोजित प्रशिक्षण शिबिरांचा संघाला खूप फायदा झाला आहे.

ती म्हणाली, आमच्या संघात अनुभव आणि युवा क्रिकेटपटूंचा उत्तम समतोल आहे. क्रिकेटपटूंमध्ये निर्भयता आणि विजयाची भूक आहे. महिला प्रीमियर लीगने (WPL) भारतीय महिला क्रिकेटला एक नवी दिशा दिली आहे. या लीगने नवीन क्रिकेटपटूंना मोठ्या स्तरावर खेळण्याचा आणि दबाव हाताळण्याचा अनुभव दिला आहे. हरमनप्रीतने संघातील वातावरणाचेही कौतुक केले. ती म्हणाली की, सपोर्ट स्टाफने ड्रेसिंग रूममध्ये खूप सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे, ज्यामुळे क्रिकेटपटूंचा आत्मविश्वास वाढला आहे.

तिने २०१७ च्या विश्वचषकाच्या आठवणीही सांगितल्या, जेव्हा इंग्लंडमध्ये तिच्या १७१ धावांच्या खेळीने भारतीय महिला क्रिकेटला एक नवी ओळख दिली होती. ती म्हणाली, २०१७ चा विश्वचषक माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. त्या स्पर्धेनंतर लोकांनी भारतीय महिला क्रिकेटला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून महिला क्रिकेटने सातत्याने प्रगती केली आहे. शेवटी, हरमनप्रीत म्हणाली की, सातत्याने चांगली कामगिरी करणे आणि भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणे हे संघाचे ध्येय आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande