बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान जूनच्या अखेरीस चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता
ढाका , 26 मे (हिं.स.)।बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान जूनच्या अखेरीस चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. बीएनपी सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा असेल. सुरुवातीला त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भुटानची निवड करण्यात आली होत
बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान जूनच्या अखेरीस चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता


ढाका , 26 मे (हिं.स.)।बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान जूनच्या अखेरीस चीन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. बीएनपी सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा असेल. सुरुवातीला त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भुटानची निवड करण्यात आली होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निमंत्रणही अद्याप स्वीकारलेले नाही.

बांग्लादेशमधील चीनचे राजदूत याओ वेन यांनी अलीकडेच सांगितले की, तारिक यांच्या आगामी चीन दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील भागीदारी आणखी मजबूत होईल आणि ती “नव्या उंचीवर” पोहोचली आहे. त्यांनी म्हटले होते, “राजकीय स्थैर्य टिकवून ठेवणे, आर्थिक विकास आणि जनकल्याणाच्या उपक्रमांमध्ये चीन बांग्लादेशला आपला पूर्ण पाठिंबा देत राहील.”

नदी प्रकल्पाव्यतिरिक्त, चीन आणि बांग्लादेश यांनी उच्च-गुणवत्तेच्या ‘बेल्ट अँड रोड’ सहकार्याला गती देण्यावर सहमती दर्शवली आहे. तसेच व्यापार, गुंतवणूक, उद्योग, डिजिटल अर्थव्यवस्था, जलसंपदा, आरोग्य आणि लोकांमधील संपर्क अशा विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्याचाही निर्णय घेतला आहे.

परराष्ट्र व्यवहार सल्लागार हुमायूं कबीर यांनी सांगितले की, पंतप्रधान तारिक कधीतरी चीन दौऱ्यावर निश्चितपणे जातील. मात्र, परदेशातील त्यांच्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्याची वेळ आणि कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.कबीर यांनी सांगितले की तिस्ता नदी व्यापक व्यवस्थापन आणि पुनर्बांधणी प्रकल्पासंदर्भात चीनसोबत झालेली चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरली आहे. तसेच, या प्रकल्पासाठी चीनची एक्झिम बँक वित्तपुरवठा करू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान,नवी दिल्लीत तारिक यांच्या संभाव्य चीन दौऱ्याकडे बारकाईने लक्ष ठेवले जाण्याची शक्यता आहे. कारण बांग्लादेश आणि चीन यांच्यात वाढत असलेल्या संबंधांमागे ढाक्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या तिस्ता नदी पुनर्बांधणी प्रकल्पासाठी चीनकडून आर्थिक मदत मिळवण्याचा बांग्लादेशचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व अशा वेळी घडत आहे, जेव्हा पाणीवाटपाचा मुद्दा भारत आणि बांग्लादेश यांच्यातील नव्या राजनैतिक तणावाचे केंद्र बनला आहे.

बांग्लादेशने स्पष्ट केले आहे की भारतासोबतचे संबंध मोठ्या प्रमाणात गंगा पाणीवाटप कराराच्या नव्या अंमलबजावणीवर किंवा त्याच्या अंतिम रूपावर अवलंबून असतील. तसेच, कोणताही अल्पकालीन करार पुरेसा ठरणार नाही, यावरही त्यांनी भर दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande