

गोयल यांनी कॅनडामध्ये भारताच्या विकास प्रवास आणि बाजारातील संधींचे केले कौतुक
कार्नी यांच्यासोबत भारत-कॅनडा द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याबाबत चर्चा
ओटावा, 26 मे (हिं.स.)। भारत आणि कॅनडा यांनी आर्थिक संबंध पुन्हा मजबूत करण्याच्या दिशेने नव्या पुढाकाराचे संकेत दिले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, दोन्ही देश यावर्षाअखेरीस मुक्त व्यापार करारासाठीची चर्चा पूर्ण करण्याचा विचार करत आहेत.
गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, दोन्ही देश २०३० पर्यंत आपला द्विपक्षीय व्यापार तिपटीने वाढवून ५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचवू शकतात. तसेच, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुक्त व्यापार कराराला यावर्षाअखेरीस अंतिम स्वरूप देण्याचे लक्ष्यही निश्चित करण्यात आले आहे. पीयूष गोयल यांनी मंगळवारी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले की, दोन्ही देश व्यापार आणि धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी कार्यरत आहेत.
गोयल यांनी कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात भारताच्या विकास प्रवासासह बाजारातील उत्कृष्ट संधींवर प्रकाश टाकला. त्यांनी ओटावामध्ये झालेल्या अर्थपूर्ण चर्चांचे कौतुक केले आणि अर्थव्यवस्था तसेच संस्कृतीसारख्या विविध क्षेत्रांत अधिक दृढ संबंध निर्माण करण्यात भारतीय प्रवासी समाजाच्या योगदानाची प्रशंसा केली.
गोयल म्हणाले की, “मी भारताच्या असामान्य विकास प्रवासाबद्दल माहिती दिली. येथील लोकांच्या आकांक्षा, उद्योजकतेची उत्साही भावना, विशाल प्रतिभासंपन्न मनुष्यबळ आणि बाजारातील व्यापक संधी यांमुळे हा विकास घडून आला आहे.”
यापूर्वी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. त्यांनी भारत-कॅनडा व्यापक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) लवकर पूर्ण होण्याबाबत आशावाद व्यक्त केला.
गोयल यांनी सांगितले की, “कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या अलीकडील भारत भेटीची प्रेमपूर्वक आठवण काढली. त्या भेटीमुळे भारत-कॅनडा भागीदारीला नवी गती आणि नवा आत्मविश्वास मिळाला आहे.”
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल २५ मेपासून कॅनडाच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत.
भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध २०२३ मध्ये तणावपूर्ण झाले होते. कॅनडामधील खलिस्तानी शीख कार्यकर्ते हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या सरकारने भारतावर आरोप केल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule