दक्षिण इराणमध्ये अमेरिकेचा हवाई हल्ला
वॉशिंग्टन , 26 मे (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे. दक्षिण इराण आणि होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेने आत्मसंरक्षणात्मक हल्ला करत इराणी क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि समुद्रात माईन्स टाकण्य
दक्षिण इराणमध्ये अमेरिकेचा हवाई हल्ला


वॉशिंग्टन , 26 मे (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे. दक्षिण इराण आणि होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेने आत्मसंरक्षणात्मक हल्ला करत इराणी क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि समुद्रात माईन्स टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या नौकांना लक्ष्य केले. अमेरिकन लष्कराने सांगितले की, ही कारवाई आपल्या सैनिकांच्या आणि युद्धनौकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आली.

विशेष म्हणजे, हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा दोन्ही देशांमध्ये युद्धविराम आणि अणुकराराबाबत चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांड अर्थात सेंटकॉमच्या मते, इराणी दलांच्या हालचाली अमेरिकन सैनिक आणि जहाजांसाठी धोका ठरत होत्या. त्यामुळे अमेरिकन लष्कराने दक्षिण इराणमध्ये मर्यादित पण अचूक कारवाई केली.

सेंटकॉमचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितले की, अमेरिकन लष्कराने आत्मसंरक्षणासाठी हा हल्ला केला आणि त्याचवेळी संयमही राखला. अमेरिकेचा दावा आहे की, इराणी नौका होर्मुज सामुद्रधुनीजवळ समुद्रात माईन्स टाकण्याचा प्रयत्न करत होत्या. तसेच काही क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे सक्रिय केली जात होती. संभाव्य धोका लक्षात घेऊन अमेरिकन लष्कराने त्यांना लक्ष्य केले. मात्र, या हल्ल्यात किती नुकसान झाले याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षविरामाच्या काळातही यापूर्वी अनेक तणावपूर्ण घटना घडल्या आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीलाही अमेरिकन लष्कराने इराणी लष्करी तळांवर हल्ला केला होता. त्यावेळी अमेरिकेने आरोप केला होता की, इराणने त्यांच्या युद्धनौकांवर क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि छोट्या नौकांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गांपैकी एक मानला जातो. येथे कोणतीही लष्करी हालचाल झाली तर त्याचा परिणाम जागतिक तेलबाजार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर होतो. त्यामुळे अमेरिका या भागात सातत्याने लष्करी देखरेख ठेवून आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या संवर्धित युरेनियमबाबतही मोठे विधान केले आहे. ट्रम्प म्हणाले की, इराणचे संवर्धित युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द केले जाईल, जेणेकरून ते नष्ट करता येईल; अन्यथा इराणसोबत मिळून त्याच ठिकाणी ते संपवले जाईल.

ट्रम्प यांनी संकेत दिले की, दोन्ही देशांमध्ये अणुकरारासंदर्भातील चर्चा पुढे सरकत आहे. त्यांनी सांगितले की, चर्चा “चांगल्या पद्धतीने” सुरू आहे. दुसरीकडे, इराणनेही अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचे मान्य केले आहे, मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांची वारंवार बदलणारी भूमिका चर्चेला अधिक गुंतागुंतीची बनवत असल्याचे म्हटले आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बकाई यांनी सांगितले की, अनेक मुद्द्यांवर चर्चेत प्रगती झाली आहे, पण अद्याप कोणत्याही अंतिम कराराचा दावा करता येणार नाही. त्यांनी म्हटले की, अमेरिकन अधिकाऱ्यांची बदलती विधाने चर्चेला कठीण बनवत आहेत. इराणचे म्हणणे आहे की, ते शांतता कराराबाबत गंभीर आहेत, मात्र त्यांना अमेरिकेच्या धोरणांवर विश्वास हवा आहे. दुसरीकडे, अमेरिका सातत्याने लष्करी दबाव कायम ठेवत आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत दोन्ही देश चर्चा पुढे नेतात की तणाव अधिक वाढतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande