
रायगड, 03 मे (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील भांदेरे गाव रविवारी अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाले. गावाचे आराध्य दैवत असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर आयोजित करण्यात आलेला कलशारोहण सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पहाटेपासूनच ग्रामस्थ, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात कलशारोहण विधी पार पडला. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भक्तांनी श्री मारुतीरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
या मंगल सोहळ्यास नामदार भरत गोगावले प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कलशारोहण पार पडताच उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना गोगावले यांनी सांगितले की, “हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नसून गावाच्या एकतेचे प्रतीक आहे. गावाच्या विकासासोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य आपण सातत्याने करणार आहोत.”
कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांनी मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
या सोहळ्यास जि.प. सदस्य दिनेश हरवंडकर, पंचायत समिती सदस्य रवी टेंबे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, महिला संघटिका वाघमारे, शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण गाव भक्ती, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणाने भारावून गेले होते. मंदिर परिसरात “जय हनुमंत”, “मारुतीराय की जय” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)