
लातूर, 03 मे (हिं.स.)।
शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता व लोकप्रतिनिधींच्या सूचनेवरून प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या तीन व चार चाकी वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहनचालकांनी उड्डाणपूल तसेच भूयारी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे मुख्य चौकातील गर्दी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत होणारी कोंडी आणि विलंब टाळण्यासाठी आतापर्यंतच्या सर्व उपायांपैकी ही उपाययोजना प्रभावी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
वाहतूक विभागाकडून या बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात येत असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis