
रायगड, 03 मे (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास परिसरात रविवारी दुपारी भीषण अपघात घडून मिनीडोर आणि इको कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, रामराज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हिराजी काष्टे यांच्या मालकीची इको कार सहाण बायपास मार्गे जात असताना समोरून येणाऱ्या मिनीडोर वाहनाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की काही काळ परिसरात घबराट आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इको कारमध्ये एकूण सहा प्रवासी प्रवास करत होते. यामधील सुरेश लांगे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर प्रवाशांनाही किरकोळ मार लागल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे खानाव येथील संतोष मगर यांच्या मालकीच्या मिनीडोरमध्ये पाच प्रवासी होते. या वाहनातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करत जखमींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेग, निष्काळजीपणा किंवा रस्त्यावरील परिस्थिती यापैकी कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त करत वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)