मराठवाडा मुक्ती संग्रामातील सशस्त्र क्रांतिकारक बळीरामजी सोनटक्के यांचे निधन
लातूर, 03 मे (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाडसी व सशस्त्र लढ्याचे अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी बापूराव सोनटक्के (वय १०१) यांचे रविवारी (दि.३) दुपारी १ वाजता चाकूर येथील त्यांच्या स्वगृही वृद्धापकाळ
निधन


लातूर, 03 मे (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील मराठवाडा मुक्ती संग्रामातील धाडसी व सशस्त्र लढ्याचे अग्रणी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बळीरामजी बापूराव सोनटक्के (वय १०१) यांचे रविवारी (दि.३) दुपारी १ वाजता चाकूर येथील त्यांच्या स्वगृही वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. ४) सकाळी १० वाजता शासकीय विश्राम गृह शेजारी, चाकूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध पेटून उठलेल्या चाकूर परिसरातील तरुणांमध्ये सोनटक्के हे अग्रस्थानी होते. अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्यासाठी शस्त्र हाती घेत सशस्त्र लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी पोलिस ठाण्यातील शस्त्रसाठा हस्तगत करून स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले. रजाकारांच्या अत्याचारांना त्यांनी कडवे प्रत्युत्तर देत जनतेच्या संरक्षणासाठी अनेक लढे उभे केले. कारावास, साखळदंड व छळ सहन करूनही त्यांच्या देशभक्तीची जाज्वल्य ज्योत कधीच विझली नाही. अहमदपूर व बिदर येथील तुरुंगवासादरम्यानही त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा जिवंत ठेवली. त्यांच्या विरोधात साक्ष देण्यास कोणी पुढे न येणे हे त्यांच्या लोकमान्यतेचे द्योतक होते. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात त्यांनी आपल्या लढ्याच्या आठवणी सांगत नव्या पिढीसमोर इतिहास जिवंत केला होता. त्यांच्या निधनाने चाकूर तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande