
* प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा
मुंबई, ३ मे (हिं.स.) : केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही व दुसरीकडे महागाईने शेती करणे कठीण झाले आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत तरीही भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. शेतकरी विरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उद्या सोमवार दि. ४ मे २०२६ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’, आयोजित केली आहे. या पदयात्रेची सांगता जळगाव जामोद येथील दुर्गा चौकात जाहीर सभेने होणार आहे. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व शेतकरी या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
सरसकट कर्जमाफी करा व शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमी भाव कायदा लागू करा, सोयाबीनला ८ हजार रुपये भाव, हरभरा ८ हजार रुपये, कापसाला १२ हजार रुपये, तुरीला १० हजार रुपये, पीक कर्जाला कुठलीही अट लावू नये, प्रती एकरी प्रती हंगाम ४० हजार रुपये पीक कर्ज द्या, कृषी साहित्य जीएसटी मुक्त करा, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारा, आदिवासी बांधवांना जातीचे दाखले द्या, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, या प्रमुख मागण्यांसाठी ही संघर्ष पदयात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी