ऐतिहासिक कामगिरीबद्दल डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा विशेष गौरव
लातूर, 03 मे (हिं.स.)। : अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली असून “मिसिंग लिंक” या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून जगातील सर्वात रुंद बोगदा निर्माण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा मान
सन्मान


लातूर, 03 मे (हिं.स.)।

: अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली असून “मिसिंग लिंक” या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून जगातील सर्वात रुंद बोगदा निर्माण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा मान मिळाला आहे. या अभूतपूर्व यशामागे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अभियांत्रिकी कौशल्य निर्णायक ठरले आहे.

या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. गायकवाड यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांचीही उपस्थिती होती. मान्यवरांनी या प्रकल्पाचे कौतुक करत महाराष्ट्राच्या पायाभूत विकासातील हा एक मैलाचा दगड असल्याचे नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “मिसिंग लिंक हा केवळ रस्ता प्रकल्प नाही, तर तो आधुनिक अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. एवढ्या कठीण भौगोलिक परिस्थितीत जगातील सर्वात रुंद बोगदा उभारणे ही एक ‘इंजिनियरिंग मार्वेल’ आहे.” त्यांनी डॉ.अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील टीमचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णत्वाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की, “हा प्रकल्प राज्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा ठरेल.” तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजित पवार यांनी डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव असून सध्या एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आहेत.त्यांनी अनेक महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली “मिसिंग लिंक” प्रकल्पाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली असून महाराष्ट्राच्या विकास गाथेत एक सुवर्ण अध्याय जोडला आहे.

या यशामुळे राज्यभरातून डॉ.अनिलकुमार गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांच्या कार्याचा आदर्श म्हणून उल्लेख केला जात आहे. “मिसिंग लिंक” प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होणार असून राज्याच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande