बाप की हैवान! पोटच्या मतीमंद लेकीवर अत्याचार करणारा नराधम बाप जेरबंद; जळकोट हादरले!
लातूर, 03 मे (हिं.स.)। रक्षणकर्ताच जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा माणुसकी नेमकी कुठे शोधावी? असा संतप्त सवाल जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील घटनेने उपस्थित केला आहे. एका मतीमंद अल्पवयीन मुलीची हतबलता पाहून तिचा सांभाळ करण्याऐवजी, तिच्यावर वारंवार
जळकोट


लातूर, 03 मे (हिं.स.)।

रक्षणकर्ताच जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा माणुसकी नेमकी कुठे शोधावी? असा संतप्त सवाल जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील घटनेने उपस्थित केला आहे. एका मतीमंद अल्पवयीन मुलीची हतबलता पाहून तिचा सांभाळ करण्याऐवजी, तिच्यावर वारंवार पाशवी अत्याचार करणाऱ्या तिच्या सख्ख्या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमाच्या कृत्यामुळे ती निष्पाप मुलगी आता १९ आठवड्यांची गरोदर असून, या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे.

नाती रक्ताळली; रक्षकच बनला भक्षक

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जन्मतःच मतीमंद आहे. तिला जगाची समज नाही, स्वतःची व्यथा मांडता येत नाही, याचाच फायदा या नराधम बापाने घेतला. माहे डिसेंबर २०२५ पासून तो तिच्यावर सतत अत्याचार करत होता. पोटच्या पोरीला त्याने आपल्या वासनेची शिकार बनवले. जेव्हा मुलीच्या शरीरातील बदलांमुळे ती गरोदर असल्याचे उघड झाले, तेव्हा पीडितेच्या आईने दिनांक १७/०४/२०२६ रोजी रात्री २३.०० वाजता जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुरुवातीला गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल झाला होता, मात्र तपासात समोर आलेले सत्य ऐकून संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.

रायबोले यांच्या पथकाची मोठी कारवाई

मुलगी मतीमंद असल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विविध पथके तयार केली. व स्वताहाः या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून त्यांनी अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने तपास करत या गुन्ह्यातील खरा गुन्हेगार हा मुलीचा बापच असल्याचे शोधून काढले. या नराधम बापाला अटक करण्यात आली असून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

समाजात तीव्र चीड आणि संताप

बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात प्रचंड संताप आहे. ज्या हातांनी लेकीला आधार द्यायचा, त्याच हातांनी तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले, अशा शब्दांत ग्रामस्थ आपली चीड व्यक्त करत आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमाला कठोरात कठोर शासन व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

या प्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गु.र.न ९९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६३ (६), ६४ (२)(आय), ६४ (२)(एम) आणि पोक्सो कायदा २०१२ चे कलम ३, ४, ५ (जे)(२), ५ (एल) अन्वये गुन्हा दाखल आहे. सपोनि एस. बी. माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande