
रत्नागिरी, 03 मे (हिं.स.) । भारतातील कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम यांवर विविध स्तरांवर आव्हाने निर्माण होत आहेत, अशी भीती ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी व्यक्त केली. या संदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
चिपळूण येथे आयोजित देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळ्यात बोलत होते. चिपळूणमधील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात काल, दि. २ मे रोजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद काथे, ज्येष्ठ पत्रकार राजेश जोष्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील मुरूड येथील पत्रकार मेघराज जाधव, सिंधुदुर्गमधील शेखर सामंत (तरुण भारत), समीर जाधव (दै. पुढारी, चिपळूण), मयूरेश पाटणकर (दै. सकाळ, गुहागर) आणि यूट्यूबर ऋषभ तोडणकर (गावखडी, रत्नागिरी) यांना ‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, पुस्तक व धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रास्ताविकात प्रसाद काथे यांनी विश्व संवाद केंद्राच्या कार्याची माहिती देत पुरस्कार निवड प्रक्रियेविषयी सांगितले. राजेश जोष्टे यांनी पत्रकारितेतील मूल्यांवर भाष्य करत विकासाभिमुख पत्रकारितेची गरज अधोरेखित केली.
अभिजित जोग यांनी आपल्या भाषणात जागतिक घडामोडी, सामाजिक माध्यमांचा प्रभाव आणि विविध विचारप्रवाहांबाबत मत व्यक्त केले. भारताची विविधतेने नटलेली संस्कृती आणि सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. निशीथ भांडारकर, संदीप खरे, दत्ता सोलकर, प्रसाद आगवेकर, डॉ. प्रफुल्ल सप्रे, मंदार लेले, डॉ. सुदेश आयरे, डॉ. विकास नातू, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी