
पुणे, 03 मे (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या नागरीकरणामुळे निर्माण होणारे वायू प्रदूषण,वाढती उष्णता,घटत चाललेली हरितक्षेत्रे आणि बदलत चाललेले हवामान यांचा नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत आहे. उष्णतेच्या लाटा,वायू गुणवत्ता खालावणे आणि पावसाच्या अनियमित पद्धती या चिंताजनक बाबी लक्षात घेता,शहरातील पर्यावरणीय संतुलन पुन्हा प्रस्थापित करणे,कार्बन उत्सर्जन कमी करणे,तापमान नियंत्रित ठेवणे आणि नागरिकांना निरोगी जीवनमान उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
या पार्श्वभूमीवर“हरित पिंपरी-चिंचवड अभियान”राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मा. महापौर रवि लांडगे यांनी घेतला आहे. राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसयांनी राज्यभर वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर करून पर्यावरण संवर्धनाचा जो व्यापक दृष्टिकोन दिला आहे,त्याच प्रेरणेने तसेच पिंपरी-चिंचवडकर नागरिकांकडून विविध माध्यमांतून प्राप्त झालेल्या सकारात्मक सूचनांचा सन्मान राखत हे अभियान हाती घेण्यात येणार आहे.
मा. महापौरांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की,शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ,निरोगी आणि शाश्वत पर्यावरण मिळणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.“एक झाड लावा,प्रदूषण दूर पळवा!”या प्रभावी संदेशातून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील वाढते तापमान कमी करणे,वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे,ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे,पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जलसंतुलन राखणे तसेच जैवविविधतेचे संवर्धन करणे या सर्व दृष्टीने वृक्षारोपण अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने हे अभियान केवळ वृक्ष लागवडीपुरते मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाची व्यापक लोकचळवळ म्हणून राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
या अभियानाची अंमलबजावणी नियोजनबद्ध व टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून,सर्व क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मोकळ्या जागा,उद्याने,रस्त्यांवरील डिव्हायडर,नव्याने विकसित होणारे रस्ते,शासकीय व महापालिका इमारतींचे परिसर तसेच नद्या व नाले परिसर यांचे सविस्तर सर्वेक्षण करून योग्य ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे. पर्यावरणाशी सुसंगत,कमी पाणी लागणा-या आणि जास्त टिकाऊ देशी वृक्षप्रजातींची निवड करून पावसाळ्यापूर्वी आवश्यक तयारी पूर्ण केली जाईल व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु