
नांदेड, 03 मे (हिं.स)
रेल्वेने दक्षिण तटीय रेल्वे या नवीन झोनची निर्मिती प्रक्रिया सुरू करताच मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांना पुन्हा वाचा फुटली आहे. नांदेड रेल्वे विभाग सध्याच्या दक्षिण मध्य रेल्वेतून वगळून मुंबई मुख्यालय असलेल्या मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. असून, हे भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या असंयुक्तिक असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
रेल्वेच्या नवीन झोन निर्मितीनंतर दक्षिण मध्य रेल्वेतील सहापैकी तीन विभाग नवीन झोनमध्ये जाणार आहेत. उरलेल्या तीन विभागांत नांदेडचा समावेश आहे. सिकंदराबादसोबतच ठेवण्याचे प्रस्तावित आहे.
दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड विभागाला सातत्याने सापत्न वागणूक मिळत आहे. येथील उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि स्थानकांतील मूलभूत सुविधांची कामे रेंगाळली आहेत, रेल्वेचे वेळापत्रकही केवळ तेलंगणातील प्रवाशांच्या सोयीनुसार ठरवले जात असल्याने महाराष्ट्रातील जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी रेल्वे मंत्र्यांना ठणकावून सांगितले
सध्या महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर हे पाचही महत्त्वाचे विभाग मध्य रेल्वे झोनमध्ये येतात. मात्र, केवळ नांदेड
विभागच तेलंगणातील सिकंदराबाद मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य रेल्वेशी जोडलेला आहे. हे भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या असंयुक्तिक असल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis