
पुणे, 03 मे (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन यांच्या वतीने “मिशन
संधी आरंभ” या उपक्रमाचे आयोजन सोमवार ४ मे रोजी वाकड येथील हॉटेल सयाजी येथे
करण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांसाठी स्वयंपूर्ण व शाश्वत एम्प्लॉयर इकोसिस्टम
उभारण्याच्या उद्देशाने वर्षभर चालणाऱ्या मोहिमेची ही सुरुवात आहे.
मिशन संधी आरंभ अंतर्गत कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, एचआर, सीएसआर प्रमुख, स्वयंसेवी संस्था (एनजीओ), सामाजिक कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी यांना दिव्यांग
समावेशन व रोजगार या विषयावर संवादासाठी एकत्र आणण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ
चर्चेपुरता मर्यादित नसून, प्रत्येक सहभागी संस्थेकडून दिव्यांगांच्या उपजीविकेसाठी औपचारिक प्रतिज्ञा
घेण्यात येणार आहे.
हा उपक्रम महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. समावेशक विकासासाठी त्यांची असलेली
बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. याशिवाय, माजी सनदी अधिकारी तथा दिव्यांग भवन फाऊंडेशनचे
व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीएफचे सेंटर ऑफ
एक्सलन्स दिव्यांग सक्षमीकरणासाठी आदर्श ठरत आहे.
इन्क्लुझ्झा, बेंगळुरू ही संस्था नॉलेज पार्टनर म्हणून कार्यरत असून, दिव्यांग समावेशन आणि ऑपर्च्युनिटी मॉडेल संदर्भात
मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय, रोहिणी पीपल टेक्नॉलॉजी प्रा. लि. ही संस्था इम्प्लिमेंटेशन
पार्टनर म्हणून कार्य पाहणार असून, कॉर्पोरेट संपर्क, सहभाग समन्वय व प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडणार
आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु