..तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमच्या घरी येऊ नये, भोरमधील पीडित मुलीच्या वडिलांची उद्विग्नता
पुणे, 03 मे (हिं.स.)। भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संताप
..तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमच्या घरी येऊ नये, भोरमधील पीडित मुलीच्या वडिलांची उद्विग्नता


पुणे, 03 मे (हिं.स.)।

भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.

उन्हाळ्याच्या सुटीसाठी आई-वडिलांसोबत आजोळी आलेल्या चिमुकलीला आरोपीने “वासरू दाखवतो” असे सांगत गोठ्याकडे नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर पुरावे लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह गोठ्यातील शेणात पुरल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भीमराव कांबळे (वय ६५, रा. साळवडे, ता. भोर) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमच्या घरी येऊ नये. या दरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पीडित कुटुंबाच्या या भूमिकेमुळे समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी कुटुंबाच्या भावनांना पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांकडून आरोपीस फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande